'महाराष्ट्र सरकार हिंदूविरोधी बनले आहे, सणासुदीच्या काळात मुद्दाम लादले निर्बंध'- मंत्री नारायण राणे यांनी साधला निशाणा
Narayan Rane | Photo Credits: Facebook)

नुकतेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. आता नारायण राणे म्हणाले आहेत की, महाराष्ट्र सरकारने मुद्दाम फक्त हिंदू सणासुदीच्या काळात निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, हे सरकार हिंदूविरोधी बनले आहे आणि केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच निर्बंधांचा जाणीवपूर्वक विचार करते. हिंदुत्वाची भाषा करणारी शिवसेना आता बदलली आहे, ज्या दिवशी भाजपने त्यांच्याशी संबंध तोडले त्या दिवसापासून शिवसेनेतील हिंदुत्व संपले आहे.

महाराष्ट्रात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे, मात्र राज्यातील कोरोना विषाणूची प्रकरणे पाहता राज्य सरकारने कोविड प्रोटोकॉल कडक केले आहे. सरकारने बाप्पाच्या दर्शनासाठी लोकांना फक्त ऑनलाईन दर्शनाचा पर्याय दिला आहे. यासह, सरकारने गणेशोत्सव दरम्यान मिरवणूक किंवा यात्रा काढण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. महाराष्ट्र सरकारकडून गणेश चतुर्थीसह पुढील 2 महिन्यांत येणाऱ्या सर्व सणांबाबत कठोर सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाचा हवाला देत, सरकारने म्हटले आहे की, आपल्याला कोरोनाची तिसरी लाट आणणे टाळायचे आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की जर, राज्यातील ऑक्सिजनची दैनंदिन मागणी 700 टनांपेक्षा वाढली तर सरकार लॉकडाऊन सारख्या उपायांचा विचार करू शकते. (हेही वाचा: Neelam Rane आणि Nitesh Rane यांना पुणे पोलिसांकडून Lookout Notice जारी)

दरम्यान, कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पुणे पोलिसांनी नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचा आमदार मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. मुंबई विमानतळ प्रशासनाला दिलेल्या सूचनेनुसार, अशी भीती आहे की हे लोक कर्ज न भरण्याच्या हेतूने कधीही देश सोडून जाऊ शकतात आणि कायदेशीर कारवाई टाळण्याचा प्रयत्न करू शकतात. पुणे पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम आणि नितेश यांच्याविरोधात 3 सप्टेंबर रोजी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.