Liquor Home Delivery: आता दारु मिळणार घरपोच! दुकानांसमोरील गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा निर्णय, 14 मे पासून सुरु होणार अंमलबजावणी
दारू होम डिलिव्हरी | प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशातील कोरोना विषाणूचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra) लॉक डाऊनच्या (Lockdown) तिसऱ्या टप्प्यामध्ये, काही प्रमाणात व्यवसाय आणि उद्योगधंदे सुरु  करण्यास परवानगी दिली गेली. आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत दारूची होम डिलीव्हरी (Liquor Home Delivery) केली जाणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन दरम्यान 14 मेपासून महाराष्ट्र सरकार मद्यपान करणार्‍यांना दिलासा देत दारूची घरपोच डिलिव्हरी सुरु करत आहे. मात्र यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही अटी घातल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी दारूच्या दुकानांना परवानगी होती फक्त अशाच ठिकाणी दारूची होम डिलिव्हरी केली जाणार आहे.

एएनआय ट्विट-

याआधी केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारने दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यावेळी दारूच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी काही ठिकाणी सामाजिक अंतर पाळले गेले नसल्यचिएहि आढळले. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात दारूची घरपोच डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अशी असेल नियमावली –

> फक्त अधिकृत परवाना असणाऱ्या मद्य दुकानांनाच, त्यांच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात ही होम डिलिव्हरी करता येणार आहे.

> डिलिव्हरी बॉयला मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे.

> होम डिलिव्हरी केवळ लॉकडाऊन काळातच वैध राहणार आहे.

> दारु पिण्याचा परवानाधारकाने दारू मागविल्यास, त्याला त्याच्या अधिकृत पत्त्यावरच दारू पोहोचती करावी लागणार आहे. (हेही वाचा: Coronavirus च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तुरुंगामधील 50 टक्के कैद्यांना तात्पुरते सोडण्याचा निर्णय)

कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे गेले कित्येक दिवस राज्यातील व्यवहार थांबले आहेत. यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दारुची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. अगदी रेड झोनमधील दुकानेही उघडण्याची परवानगी होती. मात्र यामुळे मुंबई आमि पुण्यासारख्या शहरांमध्ये दारु खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. राज्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सरकारने ताबडतोब ही दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होती. त्यानंतर आता सरकारने दारूची घरपोच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला.