Eknath Shinde, Manoj Jarange Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

पुण्यामधून मुंबईकडे आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांचं भगवं वादळ आगेकूच करत आहे. अशात मुंबईच्या वेशीवरच मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्य सरकारकडून एक शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न करत आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड आज जरांगे पाटील यांना भेटून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करत आहेत. यासाठी लोणावळा मध्ये त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे.

चर्चा सकारात्मक होईल आणि मनोज जरांगेंचे समाधान होईल असा विश्वास मधुकर राजे अर्दड यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. एका बंगल्यामध्ये ही भेट झाली असून व्हीसी किंवा फोन द्वारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्याशी बोलण्याची शक्यता आहे. सध्या मुख्यमंत्री त्यांच्या गावी सातारा मध्ये गेले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आज मोर्चा लोणावळा वरून नवी मुंबई कडे येणार आहे. यासाठी मार्गात बदल सूचवण्यात आला आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार आहे.सायन - पनवेल मार्गाचा वापर न करता पनवेल बाहेरील पळस्पे फाटा मार्गे जेएनपीटी रस्त्यावरून उलवे मार्गे पामबीच मार्गावर दाखल होणार आहे. मराठा मोर्चाचा मार्ग बदलला असल्याने पनवेल , कामोठे , कंळंबोली , खारघर मधील वाहतूक कोंडी न होता मुंबई - पुणे हायवेवरील वाहतूक सुरळीत राहण्याचा अंदाज आहे. Maratha Aarakshan Protest: मनोज जरांगे आज नवी मुंबई मध्ये दाखल होणार; वाहनधारकांना पुणे एक्सप्रेस वे सह शहरातील 'हे' मार्ग टाळण्याचे आवाहन .

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मागील 7 महिने सरकारला वेळ दिला आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. तर सरकार कडून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.