महाराष्ट्र सरकारने 'पश्चिम बंगाल' आणि 'उत्तर प्रदेश' यांना कोरोना संवेदनशील राज्ये म्हणून केले घोषित, राज्यात प्रवेश करणा-यांना RT-PCR चाचणी अनिवार्य
Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून बाहेरील राज्यांतून येणा-यांमुळे येथील कोरोना परिस्थिती आणखी बिघडू नये महाराष्ट्र सरकारने 'पश्चिम बंगाल' (West Bengal) आणि 'उत्तर प्रदेश' (Uttar Pradesh) या दोन राज्यांना कोरोना संवेदनशील राज्ये म्हणून घोषित केले आहेत. ही दोन राज्ये कोरोना उत्पत्तीची राज्ये असल्याचे महाराष्ट्र सरकाराचे म्हणणे आहे. त्यामुळे या राज्यांतून येणा-यांना RT-PCR चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आदेश काढला आहे.

सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशात, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) हे उत्पत्तीची संवेदनशील राज्ये आहेत. त्यामुळे या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना आता आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे असे म्हटले आहे.हेदेखील वाचा- COVID-19 Spike: महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकसह 'या' 10 राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर, मृतांचा आकडा चिंताजनक

त्यानुसार आता पुढील आदेश येईपर्यंत ही दोन्ही राज्ये उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे मानली जातील. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राने राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, केरळ, उत्तराखंड या राज्यांना उत्पत्तीची संवेदनशील राज्ये म्हणून घोषित केले होते. त्यानंतर आता उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही sensitive origin म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत असल्या कारणाने खबरदारी म्हणून हा आदेश काढण्यात आला असल्याचे मुख्य सचिवांचे म्हणणे आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि बिहार या 10 राज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या 10 राज्यात कोरोना रुग्णांची 73.71 टक्के नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 63,282 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 802 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची संख्या 46 लाख 65 हजार 754 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 69,615 वर पोहोचली आहे.