Maharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा
Vijay Namdevrao Wadettiwar | (Photo Credit: Facebook)

राज्यातील पूरग्रस्तांना सरकारकडून तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुरामुळे वाहून गेलेली घरं आणि पुराचं पाणी शिरलेल्या घरांमधील कुटुंबियांना 10 हजार रुपये रोख आणि पाच हजार रुपयांचे धान्य मदत रुपाने देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. याशिवाय पूर्णपणे घरं पडलेल्या कुटुंबियांना देखील मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Maharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता)

पूरात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच घोषित केली आहे. त्यातील लाखभर रुपये मुख्यमंत्री निधीतून व उर्वरीत 4 लाख रुपये एसडीआरएफमधून देण्यात येतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त महाड, चिपळूण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला असून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार, असे सांगूनही त्यांनी पूरग्रस्तांना आश्वस्त केले होते. याशिवाय पूरग्रस्तांना अन्न, औषध, कपडे आणि इतर आवश्यक गोष्टींचा  तात्काळ पुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसारच केंद्रकडून मदत मागण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते.

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. यात 164 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 जण अद्याप बेपत्ता आहेत.