Maharashtra Floods: राज्यातील पुरपरिस्थितीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं 'हे' आवाहन
Raj Thackeray | (Photo Credits: Twitter)

राज्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक दुर्घटना घडत असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं आहे. (Maharashtra Rains Updates: जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

या पत्रात राज ठाकरे यांनी लिहिले की, "महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत मनसैनिकांनी पूरग्रस्तांना जमेल तितकी मदत करावी. आता लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोका वाढेल. तुम्ही त्यात लक्ष घालून योग्य ती मदत पोहचेल, असं पाहावं. महाराष्ट्रावर मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कोणतीही कुचराई होता कामा नये."  तसंच काम करताना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी पत्राद्वारे मनसैनिकांना केलं आहे.

राज ठाकरे ट्विट:

दरम्यान, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना महाडमध्ये घडली असून यात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु असून पंतप्रधानांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.