राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या पुरामुळे (Maharashtra Flood) अतोनात नुकसान झाले आहे. या पुरादरम्यान 100 हून अधिक मृत्यू झाले, लोकांची घरे वाहून गेली, शेतजमिनी बुडाल्या तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता पूरग्रस्त भागाकडे मदतीचा ओघ सुरु आहे. लोक जमेल तशी मदत करीत आहेत. आता महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) शुक्रवारी इशारा दिला की, फसवणूक करणारे लोक बनावट संस्था तयार करून पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली ऑनलाईन देणग्या गोळा करीत आहेत.
पोलिसांच्या सायबर शाखेने म्हटले आहे की, ऑनलाईन माध्यमांद्वारे कोणत्याही संस्थेला देणगी देताना, अत्यंत काळजी घेतली पाहिजे. गेल्या आठवड्यातील पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी बर्याच संस्था काम करत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांकडे मदत मागत आहेत. अशा लोकांना मदत करतान सावधगिरी बाळगली पाहिजे असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सायबर फसवणूक करणारे राज्यातील परिस्थितीचा गैरफायदा घेत, बनावट एनजीओ आणि चॅरिटेबल ट्रस्ट तयार करून पैसे गोळा करीत आहेत. हे लोक जी बँक खाती देतात ती त्यांची वैयक्तिक खाती आहेत, त्यामुळे ऑनलाईन देणगी देताना काळजी घ्या. यापूर्वी बुधवारी राज्य सरकारने पूर आणि पावसाने बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. (हेही वाचा: Kolhapur Floods: असं किती काळ चालणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर दौऱ्यात नृसिंहवाडी गावातील ग्रामस्थांना अवाहन)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हटले होते की, पुरामुळे प्रभावित लोकांची स्थिती सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकांचे पुनर्वसन. रायगडला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य सरकार महाडमध्ये येथील लोकांसाठी कायमस्वरूपी एनडीआरएफ कॅम्प उभारत आहे. बाधित लोकांना तातडीने मदत देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे.