Maharashtra: अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना एप्रिल पर्यंत वर्ग सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
Education | (Representational Picture)

एप्रिल महिन्यातही शाळांचे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने (Maharashtra Education Department) घेतला होता. दरम्यान, निर्णयाबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून संताप व्यक्त केल्यानंतर एका पत्रका द्वारे शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. या पत्रकानुसार, केवळ अभ्यासक्रम अपूर्ण राहिलेल्या शाळांचेच वर्ग एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार आहेत. ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे त्या शाळांना वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनीही याबाबत माहिती दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या शाळांनी वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांना ३० एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याची गरज नाही. शिक्षण विभागाचे आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले. "ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा आहे, अशा शाळा रविवारसह दिवसभर वर्ग सुरू ठेवू शकतात. ज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांना एप्रिल अखेरपर्यंत काम करण्याची गरज नाही," शिक्षण विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेही उन्हाळी सुट्या रद्द केल्या नसल्याचे स्पष्ट केले. (हेही वाचा, Scholarship Examination in Maharashtra: इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत संभ्रम दूर, परीक्षा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय)

इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या आणि इयत्ता आकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत सुरु ठेवाव्यात. तसेच, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घ्याव्यात अशी सूचना राज्याच्या शिक्षण विभागाने आगोदर एका पत्रकाद्वारे काढली होती. मात्र, अनेक शाळांमध्ये नववीची परीक्षा सुरु आहे. काही शाळांनी परीक्षांचे नियोजन करुन प्रश्नपत्रीकाही तयार केल्या आहेत. त्यामुळे परीक्षांचे नियोजन पाहून पालकांनी तिकीटही आरक्षीत केले आहे. अशात शिक्षण विभागाचे परीपत्रक आले. त्यामुळे सर्व स्तरातून नाराजी आणि टीका सुरु होती. अखेर शिक्षण विभागाने आपला निर्णय बदलल्याचे परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.