राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) मोठी घोषणा केली आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आता विनातारण कर्ज मिळणार आहे. या कैद्यांना जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने हे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुणे येथे महाराष्ट्र दिन Maharashtra Day 2022) निमित्त आयोजित कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil ) यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कैदी आणि त्याच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
कारागृहात येणाऱ्या कैद्यांना न्यायालयाने शिक्षा दिलेली असते. त्यांना दंडही ठोठावलेला असतो. सहाजिकच त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा वेळी त्यांना कर्ज घेऊन आवश्यक पैसे मिळवता यावेत. यासाठी हे कर्ज दिले जाणार आहे. राज्यातील सहकारी बँकांनी याबाबत दिलेला प्रस्तावावर विचार करुन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. कर्ज घेतलेल्या कैद्याने कारागृहात कष्ट करुनच या कर्जाची परतफेड करायची आहे, असेही गृमंत्री म्हणाले. (हेही वाचा, Loudspeaker Row In Maharashtra: भोंग्यांबाबत सुप्रीम कोर्टाचाच निर्णय संपूर्ण देशासाठी लागू असेल; Dilip Walse Patil यांनी जाहीर केला सर्वपक्षीय बैठकीमधील निर्णय)
राज्य सरकारने ही योजना येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. कैद्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची ही देशभरातील पहिलीच योजना आहे. महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मेपासून ही योजना सुरु होते आहे. दीर्घ मुदतीची शिक्षा भोगणाऱ्या आणि चांगले वर्तन असणाऱ्या कैद्यांना या कर्ज योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. हे कर्ज जरी कैद्याच्या नावावर असले तरी त्या कर्जाचा वापर ते स्वत:साठी आणि आपल्या कुटुंब अथवा नातेवाईकासाठी करु शकतात. येरवडा कारागृहातील जवळपास 250 कैद्यांची या योजनेसाठी निवड केली जात आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले की, राज्यात अनेक लोक राजकीय सभा घेत आहेत. या सभेतून प्रक्षोभक वक्तव्ये केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, काही झाले तरी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जाणार नाही याची आम्ही पूरेपूर काळजी घेतो आहोत, असे त्यांनी सांगितले.