
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाबाबत (Coronavirus Pandemic) भाष्य केले आहे. भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वांतत्र्यचा लढा जिंकला आहे. यामुळे दरवर्षी हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, जगभरासह भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोना महामारीपासून स्वांतत्र्य मिळवण्यासाठी भारत आणखी एक युद्ध लढत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स, नर्सेस, इतर वैद्यकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हेच खरे कोविड योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 150 टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रासह संपूर्ण भारत कोरोना संकटावर मात देण्यास लवकरच यशस्वी ठरेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- Healthcare Facilities: महाराष्ट्रात खेड्यापाड्यांत आणि दुर्गम भागापर्यंत उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पोहोचविण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आणखी 12 हजार 608 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 364 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 72 हजार 734 वर पोहचली आहे. यापैंकी 19 हजार 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.