महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचाच होणार, संजय राऊत यांचा दावा
Sanjay Raut (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शनिवारी भाजप (BJP) पक्षाला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण आले. त्यानंतर सत्ता स्थापनेबाबत हालचालींना वेग आला. पण आज (10 नोव्हेंबर) भाजपने आम्ही सत्ता स्थापनासाठी असमर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्याबाजूला आता शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेना कोणत्या पक्षासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

रविवारी भाजप पक्षाच्या शिष्टमंडळाने कोश्यारी यांची भेट घेत अल्पमताचे सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. शनिवार पर्यंत भाजप आम्ही सत्ता पुन्हा राज्यात स्थापन करु शकतो यावर ठाम होती. मात्र आज सत्ता स्थापन करणार नसल्याची भुमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यानंतर लगेच शिवसेनेने आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याचसोबत शिवसेनेने 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेऊ असा प्रस्ताव भाजपला दिला होता. तरीही भाजपने या निर्णयाचे स्वागत न करता त्याचा विरोध केला आहे. रविवारी भाजप आणि शिवसेनेच्या बैठका पार पडल्या. त्यानुसार भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत काही तोडगा निघाला नाही.

ANI Tweet:

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बैठक बोलावली होती. शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री होणार अशी भुमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.(महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपा असमर्थ; महाआघाडी सोबत जायचे असल्यास शिवसेनेला शुभेच्छा: चंद्रकांत पाटील)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्यामध्ये भाजपला 105, शिवसेना 56 जागांवर विजय मिळवता आला आहे. परंतु निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने आधीच मुख्यमंत्री पद आम्हाला सुद्धा मिळावे ही अट भाजप समोर ठेवली. मात्र निकालानंतर 15 दिवस उलटून गेले तरीही सत्ता स्थापन न झाल्याचे दिसून आले. अखेर आज भाजपने सुद्धा आम्ही राज्यात सत्ता स्थापन करणार नसल्याचे म्हटले आहे.