Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

Maharashtra Legislative Council Election 2020:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासाठी यंदाची महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2020 फार महत्वाची होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत  इतर आठ उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांवर 21 मे रोजी निवडणुका होणार होत्या. परंतु याची गरज भासली नाही, कारण 3 उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली आहेत. त्यानंतर आता केवळ 9 उमेदवारच मैदानात उरले असल्याने, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सहा महिन्याच्या अवधीमध्ये त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणे आवश्यक होते. आज विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. महाराष्ट्रातील विधानपरिषदेत बिनविरोध निवड झालेल्या 9 सदस्यांमध्ये शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, कॉंग्रेसचे एक आणि भाजपच्या चार सदस्य यांचा समावेश आहे.

पीटीआय ट्वीट - 

शिवसेनेकडून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे आहेत, काँग्रेसकडून राजेश राठौर यांचे नाव आहे, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची निवड झाली आहे, तर भाजपकडून प्रवीण दटके, रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर यांची नावे आहेत. सध्या राज्यावर कोरोनाचे संकट असताना अशा काळात राजकारण घडू नये, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा शिवसेना व राष्ट्रवादीची होती. मात्र कॉंग्रेसकडून एजून एका उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्याने पेच प्रसंग उभा राहिला होता. अखेर महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर कॉंग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेतला.  (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 13 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत वैध; अपक्ष उमेदवार राठोड शेहबाज अलाउद्दीन यांचे नामनिर्देशनपत्र अवैध)

महाराष्ट्राचे CM Uddhav Thackeray आणि इतर आठ जण विधानसभेवर बिनविरोधात निवडले गेले - Watch Video

राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात होते. त्यातील एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. त्यानंतर तिघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.  दरम्यान, विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोहळा, सोमवारी दुपारी 1 वाजता विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आता 6 महिन्याच्या आत उद्धव ठाकरे आमदारकीची शपथ घेतील.