महाराष्ट्रामध्ये आज 18 मंत्र्यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये एकाही महिलेचा समावेश नसल्याने सध्या शिंदे-फडणवीस सरकार वर टीका होत आहे. एनसीपी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य होतं ज्यांनी महिलांना आरक्षण दिलं पण आता शिंदे-फडणवीस सरकार मध्ये एकही महिला कॅबिनेट मंत्री नाही. देशात 50% महिला लोकसंख्या असताना त्यांचं कॅबिनेट मध्ये प्रतिनिधित्त्व नसणं यामधून भाजपाची मानसिकता दिसून येते अशा शब्दांत त्यांनी पुन्हा भाजपा (BJP) वर टीकेचे बाण सोडले आहेत.नक्की वाचा: Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दादा भुसे, अब्दुल सत्तार ते राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांचाही समावेश .
भारताचे पंतप्रधान 'स्वतः नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे' असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
पहा सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार @supriya_sule यांनी केली आहे. pic.twitter.com/x6rJbq2DKu
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "सुप्रिया सुळे तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा." अशी टीपणी केली होती. तेव्हा देखील सुप्रिया सुळे यांनी भाजपा कडून आलेल्या या टीपण्णीचा निषेध नोंदवत 'होम मेकर' असणं कमी पणाचं समजत नसल्याचं म्हटलं होतं.