Chhagan Bhujbal (Photo Credits: ANI)

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्रातील नव्या महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने, अजित पवार यांचे पक्षनेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज आहेत. भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. भुजबळ नागपूर अधिवेशन सोडून नाशिकला गेले असून, समता परिषदेच्या लोकांसह समर्थकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबत माध्यमांशी बोलताना पुढील वाटचालीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं....’. यावरून छगन भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भुजबळ समर्थक नाराज-

अहवालानुसार, भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर ओबीसी समाजाकडून आंदोलन केले जाणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित गटाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देणार असल्याचा इशारा दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

राज्यसभेची ऑफर नाकारली-

दुसरीकडे, माजी मंत्री भुजबळ यांनी आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेची ऑफर दिली होती, मात्र मी ती फेटाळून लावल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आमदार भुजबळ म्हणाले की, त्यांनी राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारली, कारण गेल्या महिन्यात झालेल्या राज्य निवडणुकीत त्यांनी जिंकलेल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा विश्वासघात झाला असता.

माजी राज्यमंत्री म्हणाले, ‘या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा मला राज्यसभेवर जायचे होते, तेव्हा मला विधानसभेची निवडणूक लढवावी, असे सांगण्यात आले होते. मला आठ दिवसांपूर्वी राज्यसभेच्या जागेची ऑफर आली होती, ती मी नाकारली. मी एक किंवा दोन वर्षांनी राज्यसभेच्या पर्यायाचा विचार करू शकतो, पण लगेच नाही.’ छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते आहेत. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरंगे यांना आपण विरोध केल्याचा दावा त्यांनी केला. याच कारणामुळे मला मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी बोलले नसल्याचेही भुजबळ म्हणाले. (हेही वाचा: महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली रामदास आठवले यांची जाहीर माफी)

दरम्यान, महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये भुजबळांची गणना होते. शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात करणारे भुजबळ शरद पवारांना आपले गुरू मानतात. भुजबळ नाराजी दाखवत असले तरी अखेर ते राज्यसभेच्या जागेसाठी राजी होतील, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ अजित पवारांची राष्ट्रवादी सोडू शकतात, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री करण्यात आले होते.