Maharashtra Cabinet Expansion: नव्या महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सर्व मंत्री कोट्याधीश; जाणून घ्या कोणाकडे किती संपत्ती
Devendra Fadnavis And Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadnavis) सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी (9 ऑगस्ट) झाला. यामध्ये 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापैकी शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या 9 जणांना मंत्री करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृह आणि वित्त खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर नगरविकास खाते मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे राहणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांना ऊर्जा मिळू शकते, गिरीश महाजन यांना जलसंपदा, राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल मिळू शकतो. संजय राठोड यांना ग्रामविकास खाते दिले जाऊ शकते. चंद्रकांत पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात फडणवीस यांचे निकटवर्तीय ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना शपथ देण्यात आली नाही. यासोबतच प्रखर नेते आशिष शेलार यांनाही शपथ घेण्याची संधी मिळालेली नाही. अशा स्थितीत चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यामुळे रिक्त झालेले भाजप प्रदेशाध्यक्षपद आता चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले जाऊ शकते आणि मुंबई महापालिकेची निवडणूक पाहता आशिष शेलार यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

नवीन मंत्रिमंडळात एक मंत्री 10वी पास तर पाच मंत्री 12वी पास आहेत. याशिवाय एक अभियंता आणि सात पदवीधर आणि दोन मंत्र्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. एका मंत्र्याने डॉक्टरेट मिळवली आहे. भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे हे उच्चशिक्षित मंत्री आहेत. 18 मंत्र्यांपैकी 70 टक्के मंत्र्यांवर राजकीय आणि फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यापैकी 12 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत.आता सर्व मंत्र्यांच्या संपत्तीवर नजर टाकूया.

शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व मंत्री कोट्यधीश आहेत. मुंबईतील मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 441 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. लोढा यांच्याकडे 252 कोटी रुपयांची जंगम आणि 189 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्याकडे 14 लाख रुपयांची जग्वार कार आणि शेअर बाजारात काही गुंतवणूक आहे. लोढा यांचे दक्षिण मुंबईतही 5 फ्लॅट आहेत. लोढा यांच्यावरही पाच गुन्हे दाखल आहेत. (हेही वाचा: निष्ठावंतांनो फक्त पक्षकार्य करा, आयारामांच्या गळ्यात मंत्रिपदाच्या माळा; एकनाथ शिंदे सरकारचा थाटच न्यारा)

2 कोटींची संपत्ती असलेले संदीपान भुमरे हे मंत्रिमंडळातील सर्वात गरीब मंत्री आहेत. ते पैठणचे आमदार आहेत. गेली 35 वर्षे ते शिवसेनेत कार्यरत होते. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ते उद्धव छावणीतून बाहेर पडले. तानाजी सावंत, 115 कोटींच्या संपत्तीसह दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. तानाजी सावंत हे आधी राष्ट्रवादीत होते, नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता शिंदे गटामध्ये ते आहेत. तिसरे श्रीमंत मंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. त्यांची संपत्ती 82 कोटी आहे.

बाकी सर्व मंत्र्यांबद्दल बोलायचे झाल्यास, विजय गावित (भाजप) यांच्याकडे 27 कोटी, गिरीश महाजन (भाजप) यांच्याकडे 25 कोटी, राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) यांच्याकडे 24 कोटी, अतुल सावे (भाजप) यांच्याकडे 22 कोटी आहेत. तसेच अब्दुल सत्तार (शिंदे गट) यांच्याकडे 20 कोटी, शंभूराज देसाई (शिंदे गट) 14 कोटी, सुधीर मुनगंटीवार (भाजप) 11.4 कोटी, दादा भुसे (शिंदे गट) यांच्याकडे 10 कोटींची मालमत्ता आहे.