न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नागपूर (Nagpur), अकोला (Akola), वाशिम (Washim), धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) या पाच जिल्हा परिषदांमधील तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण रद्द करून त्या जागांवर पोटनिवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील पोटनिवडणुका सहा महिन्यांसाठी स्थगित करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका सोमवारी राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यामधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी 22 जून रोजी घोषणा केली होती. तर, पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका तेथील कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले होते. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray: पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आजही चांगले सबंध: शिवसेना खासदार संजय राऊत
न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा, तसेच त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे. तर, 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मदान यांनी म्हटले आहे.