Students | File Image

दहावीच्या परीक्षेमध्ये (Maharashtra Board SSC Exam) उत्तीर्ण होण्याचं दडपण कमी करण्यासाठी आता गणित (Maths) आणि विज्ञान (Science) विषयामध्ये पास होण्यासाठी किमान मार्क्स कमी करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 20 पेक्षा अधिक आणि 35 पेक्षा कमी मार्क्स असतील तरी त्यांचं पुढील शिक्षण थांबणार नाही असा एक पर्याय विद्यार्थ्यांना देण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान याबाबतची तरतूद राज्य अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आल्याची माहिती दिली गेली आहे. दरम्यान आराखड्याला मंजुरी मिळाली असली तरीही प्रत्यक्षात त्यानुसार बदल तातडीने होणार नसल्याचं सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार आता दोन पर्याय

दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित आणी विज्ञान विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता दोन पर्याय दिले जाण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये एकतर त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल आणि दुसर्‍या पर्यायामध्ये किमान 20 आणि 35 पेक्षा कमी मार्क्स असले तर त्यांच्या निकालात शेरा दिला जाईल ज्यानुसार त्यांना पुढील शिक्षणात गणित/विज्ञान किंवा दोन्हींवर आधारित विषय न घेता पुढील शिक्षण घेता येणार आहे. नक्की वाचा:  महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती. 

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने या आराखड्याला अंतिम मान्यता दिली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात गणित आणि विज्ञान या विषयाबद्दल खूप भीती असते. परिक्षेत अपयश मिळेल या भीतीने अनेक विद्यार्थी जीवन संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतात पण आता ही भीती मनातून काढून टाकत जर त्या विषयाशी निगडीत शिक्षण घ्यायचंच नसेल तर त्यामुळे पुढील शिक्षण थांबवण्याची गरज नाही असं म्हणत हा नवा पर्याय ठेवला आहे.