सध्या देशभरात बोर्डाचे निकाल जाहीर केले जात आहेत. महाराष्ट्रातही 10वी निकालानंतर 12वीचे निकाल कधी लागणार? याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलै पूर्वी दहावी,बारावीचे निकाल जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण अद्यापही महाराष्ट्र बोर्डाने 12 वी निकालाची तारीख (Maharashtra Board HSC Result Date) जाहीर केलेली नाही. यंदा दहावी निकालाच्या वेळेस विद्यार्थ्यांना वेबसाईट क्रॅश झाल्याने अनेक तास निकाल जाहीर होऊनही पाहता आला नव्हता पण तसेच बारावी निकालाच्या वेळेस होऊ नये म्हणून बोर्डाकडूनही काळजी घेतली जात आहे. सोबतच महाराष्ट्राला बसलेल्या पूराचा फटका आता बारावी निकालाला देखील बसल्याची माहिती समोर येत आहे. पण बोर्डाकडून येत्या काही दिवसात निकालाची तारीख जाहीर केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे असे टाईम्स नाऊचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने विद्यार्थ्यांना निकाल तपासण्यासाठी रोल नंबर्स जारी केले आहेत. नक्की वाचा: Maharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावी विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी; कसा पाहाला तुमचा सीट नंबर? जाणून घ्या सोप्या स्टेप्स.
दरम्यान 12वी निकालाची तारीख अद्याप जाहीर न झाल्याने संभ्रमात असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी निकाल तारीख जाहीर करण्याचं आवाहन बोर्डाला आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे. या निकालाच्या तारखेसोबतच अनेक विद्यार्थी MHT CET 2021 Examination च्या तारखेबाबतही स्पष्टता मागत आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी प्रोफेशनल कोर्स साठी अॅडमिशन मिळवतात. यंदा ही परीक्षा प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार का? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
#DeclaredHSCResult हा हॅशटॅग देखील काल ट्वीटर वर ट्रेंड करत विद्यार्थ्यांनी बारावी निकालाच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यांकडे उत्तर मागितले होते. दरम्यान अद्याप MSBSHSE कडून बारावी निकाल आणि त्याच्या तारखेवर अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बोर्डाने शाळा आणि कॉलेजला विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स 23 जुलै पर्यंत भरण्यासाठी मुदत दिली होती. पण मागील काही दिवसांत राज्यात काही ठिकाणी पूराची परिस्थिती पाहता काम खोळंबल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षकांनीही मार्क्स अपडेट करण्याच्या कामासाठी वेग मागून घेतला आहे. मार्क्स अपडेट करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर लगेजच निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदादेखील बारावी निकालाच्या आधी किमान 1 दिवस तारीख जाहीर केली जाऊ शकते. त्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांचे मार्क्स जाहीर केले जातील.