Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

महाराष्ट्रात सध्या 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षा (Board Exam) सुरू आहेत. यंदाच्या 12वीच्या बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्याच झालेल्या इंग्रजी विषयाच्या (English Paper) पेपर मध्ये चूकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना 6 गुणांची लॉटरी लागली आहे. बोर्डाने चूका झाल्याचं मान्य केल्याने या चूकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून बोर्डाने त्या प्रश्नाचे 6 गुण देण्याचं ठरवलं आहे.

बारावीच्या पहिल्या इंग्रजीच्या पेपर मध्ये कविता विभागामध्ये काही प्रश्नांमध्ये चूका होत्या. 3 चूका बोर्डाने मान्य करत त्याचे 6 गुण विद्यार्थ्यांना दिले जातील असं म्हटलं आहे. इंग्रजीच्या पेपर मधील चूकांची विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर बोर्डानेही त्यावर अहवाल मागवून घेतला. तज्ञांच्या बैठकीमध्ये इंग्रजीच्या पेपर मध्ये चूका असल्याचं समोर झाल्यानंतर बोर्डानेही ही चूक मान्य केली आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे चूकलेले 3 प्रश्न सोडवण्यास घेतले त्याचे गुण दिले जातील असं आता जाहीर केले आहे. बोर्डाने त्याबाबतचं परिपत्रक जारी करत विद्यार्थी, पालक, शिक्षकांना माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोलापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदा कोविड निर्बंधांशिवाय परीक्षा पुन्हा पहिल्याप्रमाणे घेण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात 12वी पाठोपाठ 10वी ची देखील परीक्षा सुरू झाली आहे. Maharashtra Board Exams 2023: पुण्यात परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी निर्बंध अधिक कडक; जिल्हाधिकार्‍यांनी दिले इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे निर्देश .

यंदा बोर्डाच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी विविध कडक नियम राबवले जात आहेत. मात्र राज्यात काही ठिकाणी परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्याचे, सामुहिक कॉपीचे काही प्रकार समोर आले आहेत. शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचेही समोर आले आहे. दौंड मध्ये अशाच एका सामुहिक कॉपीच्या प्रकारामध्ये 9 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.