CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप (BJP) नेतृत्वाच्या आक्रमक राजकारणाला शिवसेनेने महाराष्ट्रात धोबीपछाड दिला. महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे मिळून महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेत आले. भाजपसाठी प्रामुख्याने महाराष्ट्र भाजप नेतृत्वासाठी आणि केंद्रीय नेतृत्वासाठीही हा मोठा धक्का होता. भाजप नेते मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना पक्षाच्या खेळीमुळे गर्भगळीत झालेले महाराष्ट्रातील भाजप नेते दररोज हे सरकार पडणार असे सांगत होते. खास करुन यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), सुधी मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासह प्रविण दरेकर आणि इतरही अनेक भाजप नेत्यांचा समावेश होता. मात्र, आता याच नेत्यांची भाषा बदलली आहे. ही भाषा कशी बदलत गेली यावर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष.

सरकार पडण्याच्या तारखाही जाहीर

महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप नेत्यांनी भविष्यवाणी व्यक्त करण्यास सुरुवात केली. राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एक अभद्र युती आहे. अभद्र युती आणि जनादेश डावलून सत्तेत आलेले हे सरकार काही दिवसांतच कोसळणार असल्याची भविष्यवाणी करत भाजप नेते राज्यभर फिरत होते. त्यावेळी खासदार असलेले विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर ''महाराष्ट्रातील चालू घडामोडी पाहता, असं वाटतं की, सरकार आज पडेल की उद्या पडेल. पण मी त्याची मुदत 11 दिवसांपर्यंत वाढवलीय'' असे म्हणत हे सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ''महाविकास आघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, थेट कृती करु'', असे सांगत मविआ सरकारबाबत भविष्यवाणी केली. रावसाहेब दाणवे यांनीही ''हे सरकार तीन महिन्यात पडणार आहे. कधी पडणार याची तारीख लवकरच मीडियाला कळवतो'' असे म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ''हे सरकार पाडण्याची गरज नाही. त्यांच्यातील आंतर्विरोधातूनच ते पडले. ते ज्या दिवशी पडेल त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ'' अशी प्रतिक्रिया दिली. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council: 12 सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खोचक प्रतिक्रिया)

भाजप नेत्यांची बदलली भाषा

महाविकासआघाडी सरकार पडण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यंची अलिकडील भाषा मोठ्या रंजकतेने बदलताना दिसत आहे. भाजप नेत्यांनी प्रयत्न करुनही महाविकासआघाडी सरकार अद्यापही सत्तेवरच आहे. अर्थात महाविकासआघाडी सरकारमध्ये अनेक मतभेद आहेत. विविध खात्यांचे मंत्री परस्पर विरोधी वक्तव्य करताना अनेकदा दिसून येतात. परंतू, असे असले तरी सरकार मात्र स्थिर आहे. सरकार बळकट असल्याचे लक्षात आल्यानंतर आता भाजप नेते सावध भूमिका घेत वक्तव्य करताना दिसत आहेत.

सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो- देवेंद्र फडणवीस

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सरकारबाबत भाष्य करताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ''पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार निवडून द्या. या सरकारचा मी करेक्ट कार्यक्रम करतो''. या ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आला. मात्र, फडणवीस हे सरकारचा (मविआ) करेक्ट कार्यक्रम कधी करतात याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Assembly | (Photo Credits-Twitter)

राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल- रावसाहेब दानवे

केंद्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेच वक्तव्य केले की, ''हे तीन पक्षांचे सरकार आहे. एकमेकांच्या पायात पाय घालून हे सरकार स्वत:हूनच पडेल. 'अमर अकबर अँथनी ' यांच्याप्रमाणे या सरकारची तोंडे तिन्ही वेगवेगळ्या दिशेला आहेत. त्यामुळे हे सरकार लवकरच स्वत:हून पडेल. हे सरकार जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभाऊ '' असेही दानवे यांनी म्हटले आहे.

Raosaheb Danve | (Photo Credits: Facebook)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकासआघाडी सरकारच्या अनेक नेत्यांनी हे सरकार स्थिर असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर सुरुवातीलाच 'हे सरकार पाडून दाखवाच' असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाची बदलती भाषा हे सरकार अधिक मजबूत असल्याचे दर्शवते आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.