Maharashtra Legislative Council: 12 सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खोचक प्रतिक्रिया
Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (Maharashtra) सत्ता स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुपंली आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. यातच विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीबाबत (Maharashtra 12 MLC Nominees) अद्यापही निर्णय न झाल्याने सत्ताधाऱ्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. मात्र, यावर आता स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

देशात आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याचदरम्यान, पुण्यातील विधानभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित होते. यादरम्यान, काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राज्यपालांनी दिलेली प्रतिक्रियेनंतर अजित पवारांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले. हे देखील वाचा-Maharashtra: नितीन गडकरी यांच्या पत्रातील आरोपांवर अजित पवार, नाना पटोले, बच्चू कडू यांच्याकडून भाष्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेबाबत उत्सुकता

शरद रणपिसे यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निर्णयाबाबत विचारले असता भगतसिंह यांनी तिथे उपस्थित असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवून राज्यपाल म्हणाले, “हे माझे मित्र आहेत. सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता?” राज्यपालांच्या या उत्तरावर खुद्द अजित पवार यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य दिसून आले.

दरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या उत्तरावर अजित पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आज स्वातंत्र्यदिन आहे. या विषयावर नंतर बोलेन”, एवढेच बोलून अजित पवारांनी विषय टाळला. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.