शिवसेना नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या विधिमंडळातील निलंबनाच्या कालावधी मध्ये कपात करण्यात आली आहे. 5 दिवसांवरून आता त्यांचे निलंबन 3 दिवसांवर करण्यात आले आहे. दरम्यान दानवेंच्या निलंबनाचा पुन्हा विचार करावा यासाठी पत्र देण्यात आले होते. त्यावर बैठकीत निर्णय घेऊन अखेर निलंबन कमी करण्यात आले आहे.
अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केल्यावरून त्यांचे निलंबन करण्यात आले होते. सभागृहात असभ्य भाषेचा वापर केल्याने लाड यांच्याकडून कारवाईची मागणी करण्यात आली होती पण आता दानवेंचं निलंबन 5 वरून 3 दिवस केले आहे. उद्या 5 जुलै पासून दानवे पुन्हा विधिमंडळाच्या कामात सहभागी होऊ शकणार आहेत. Ambadas Danve: राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्र विधान परिषदेत वाद; अंबादास दानवेंची शिवीगाळ (Watch Video).
अंबादास दानवे यांनी माफीचे पत्र दिले होते त्यानंतर त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पत्र दिल्यानंतर निलंबनाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय झाला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाचा निषेध व्यक्त करण्याचा ठराव मांडण्यात यावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली होती. तसंच यावर अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, असं दरेकर म्हणाले होते मग अंबादास दानवे बोलायला उभे राहिले. संबंधित विषय हा लोकसभेतला आहे. त्यावर इथं चर्चा होणं अपेक्षित नाही, असं बोलत असताना सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर अंबादास दानवे आक्रमक झाले आणि त्यामध्ये तोल जाऊन काही असभ्य शब्द त्यांच्या तोंडून निघाले. प्रसाद लाड यांनी त्या शब्दांच्या वापरावरून निलंबनाची मागणी केली होती.
विधान परिषदेमध्ये निलम गोर्हे यांनी 5 दिवसांच्या निलंबन कारवाईची माहिती दिली.