Maharashtra Legislative Assembly | (Photo Credit : Youtube)

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशाच्या तोंडावर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची चर्चा रंगली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, काही झाले तरी विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार. दरम्यान, काँग्रेस (Congress) पक्षातही विधानसभा अध्यक्षपदासाठी (Maharashtra Assembly Presidential Election) जोरदार स्पर्धा असल्याची चर्चा आहे. सध्यास्थितीत पुणे येथील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte), मुंबईतील आमदार अमिन पटेल (Amin Patel) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस हायकमांडकडून कोणाच्या नावाला पसंती मिळते याबाबत उत्सुकता आहे. विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलैला होणार आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवर यांच्याशी महाविकासआघाडी सरकारमधील नेते चर्चा करणार होते. त्यानंतर काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदासाठी नाव जाहीर करणार होते. परंतू, विधिमंडळ अधिवेशन केवळ दोन दिवसांचे आहे. त्यामुळे अध्यक्षपद निवडीबाबत इतक्या तत्काळ निर्णय घणे योग्य नाही असे सांगत हायकमांड सोनिया गांधी यांनी अनुकुलता दाखवली नसल्याचे समजते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी याबाबत माहिती दिल्याचे समजते. (हेही वाचा, Maharashtra ZP Election 2021: महाराष्ट्रातील पोटनिवडणुका पुढील सहा महिन्यासाठी स्थगित कराव्यात, सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका)

महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार आहे. त्यात दुमत नाही. अध्यक्ष पदाची निवड येत्या पावसाळी अधिवेसनात होईल असे थोरात यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या भेटीबाबतही थोरात यांनी सांगितले की, अशी भेट होणे यात काही विशेष बाब नाही. शरद पवार हे महाविकासआघाडीचे मार्गदर्शक आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होत असेल तर ते चांगलेच आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन असा, विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.