निवडणुकीच्या मतदान सत्रात प्रत्येक मतदाराचे मत नोंदवण्यात यावे आणि परिणामी सर्वाना आपल्या हक्काची अंमलबजावणी करण्याचा हक्क मिळावा याकरिता काही वर्षांपूर्वी 'वरीलपैकी कोणीही नाही' म्हणजेच NOTA हा पर्याय तयार करण्यात आला होता. यंदाच्या लोकसभा व आता सध्या सुरु असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2019) हजारो नागरिकांनी या पर्यायाला पसंती दर्शवल्याचे समोर आले आहे. आज सकाळपासून सुरु असणाऱ्या मतमोजणीत देखील हा नोटाचा पर्याय काही दिग्गज नेतेमंडळींना टक्कर देताना पाहायला मिळतोय. बोरीवली (Borivali), लातूर ग्रामीण (latur Rural) आणि पलूस -कडेगाव (Palus-Kadegaon) या विधानसभा मतदारसंघातून तर हजारोंच्या घरात मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पलूस -कडेगावात सर्वाधिक म्हणजेच 20 हजार जणांनी , लातूर ग्रामीण मध्ये 16 हजार जणांनी तर मुंबई उपनगर जिल्हयातील बोरीवली विधानसभा मतदारसंघात 10 हजार नोटा मते पडली आहेत.
नोटा मतांच्या या आकडेवारीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरत आहे, याठिकाणी माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख तर विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांच्यात मतांची लढत रंगली आहे, यामध्ये धिरज देशमुख आघाडीवर असले तरी येथे त्यांना कोणताही उमेदवार नाही तर नोटा टक्कर देत आहे. या मतदारसंघात तब्बल 7 हजार 619 मतदारांनी 'नोटा'चे बटण दाबलं आहे.
बोरिवली मतदारसंघात सुद्धा भाजपाच्या सुनील राणे यांनी सुद्धा लाखाहून अधिक मतांची प्राप्त करत विजयाची चिन्हे दर्शवली असून सोबतच 10081 मते ही नोटाला पडल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे पलूस- कडेगाव येथे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे आघाडीवर आहेत तर 20572 नागरिकांनी नोटा चा पर्याय निवडला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची काही निकाल हळूहळू हाती येऊ लागले आहेत. राज्यात अद्याप महायुतीने आघाडी कायम ठेवली असली तर दाव्यानुसार व अपेक्षेपेक्षा बरीच कमी मते सेना- भाजपाच्या उमेदवारांच्या पदरी आली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाने चांगलीच गती धरली असल्याचे समोर येत आहे. आजच्या दिवसाखेरीस हे सर्व निकाल हाती येऊन महाराष्ट्रात सत्ता कोणाच्या हाती येणार या प्रश्नाचे उत्तर समोर येईल.