Ajit Pawar | (Photo Credit- X)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) साठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडत आहे. तत्पूर्वी राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून प्रचार जोरदार सुरु आहे. अशा निवडणूक आयोगही (ECI) सक्रीय असून, राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टर, बॅग्ज आणि वाहनांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची यांच्याही बॅग्ज तपासल्या. धक्कादायक म्हणजे तपासणी अधिकाऱ्यांना पैसे किंवा इतर कोणत्या वस्तू सापडण्याऐवजी चक्क दिवाळी फराळ सापडला. बॅगमधी चकल्या पाहून अधिकाऱ्यांनाही काहीशी गंमत वाटली. प्रचारासाठी येत असताना 13 नोव्हेंबर रोजी बारामतीमध्ये पवारांच्या बॅग्जची तपासणी करण्यात आली.

बॅग्ज तपासण्यावरुन राजकारण?

शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅग्ज प्रथम तपासण्यात आल्या. एखाद्या पक्षाच्या प्रमुखाच्या वाहनाची आणि हेलिकॉप्टर, बॅग्जची तपासणी करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ होती. त्यामुळे ठाकरे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तपासणी अधिकाऱ्यांचीही त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. शिवाय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा पंतप्रधा नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅग्ज तपासल्या काय? की मीच प्रहिले गिऱ्हाईक सापडतो का? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी जाहीर सभेतूनही हा प्रश्न विचारल्यानंतर आता इतरही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बॅग्ज तपासण्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या. निवडणूक आयोगानेही अजित पवार आणि तत्सम नेत्यांच्या बॅग्ज तपासल्या. (हेही वाचा, Uddhav Thackeray's Bag Checked: उद्धव ठाकरे यांची सलग दुसऱ्या दिवशीही हेलिपॅडवर तपासली बॅग; जाहीर सभेत भडकले पक्षप्रमुख)

अजित पवार यांच्याकडून स्पष्टोक्ती

राष्ट्रवादी-भाजप युती अंतर्गत बारामतीतून निवडणूक लढविणारे अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देत आपल्याही बॅगा तपासल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, "आज, मी निवडणूक प्रचारासाठी जात असताना, निवडणूक आयोगाने माझ्या पिशव्या आणि हेलिकॉप्टरची नियमित तपासणी केली. मी पूर्ण सहकार्य केले आणि मला विश्वास आहे की मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी अशा उपाययोजना आवश्यक आहेत. आपण सर्वांनी कायद्याचा आदर करूया आणि आपल्या लोकशाहीची अखंडता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊया ", असे त्यांनी एक्सवर लिहिले.

खा..खा..चकली खा

राजकीय प्रतिक्रियाः सुप्रिया सुळे यांची 'गलिच्छ राजकारण' वर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडून केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बॅग्ज तपासण्यासच प्राधान्य देण्यावरुन जोरदार टीका केली आहे. शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांच्या बॅग्जच्या नुकत्याच झालेल्या तपासणीचा संदर्भ देत त्यांनी निवडणूक आयोगावर अनुचित व्यवहार केल्याचा आरोप केला. केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या पिशव्या तपासल्या जाऊ शकतात हे कसे शक्य आहे? उद्धव ठाकरे यांच्या पिशव्यांची दोनदा तपासणी करण्यात आली, तर सत्तेत असलेल्या नेत्यांची अशी कोणतीही छाननी झालेली नाही. महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण केले जात आहे, असे सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.