Maharashtra Assembly Elections 2019 Voting: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाचा टक्का घसरला; राज्यात 6 वाजेपर्यंत केवळ 60.25 % मतदान
Voting In Maharashtra | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी (Maharashtra Assembly Elections 2019) चा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान (Voting Day) आज सकाळी 7 वाजल्यापासून आरंभला होता. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात हे मतदान पार पडले. यंदा मतदानाचा टक्का वाढावा याकरिता सुरुवातीपासूनच अनेक राजकीय मंडळी व संस्थांनी अनेक उपक्रम राबिवले होते, मात्र तरीही सध्या समोर येणारा मतदानाचा टक्का हा असमाधानकारक आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांच्या माहितीनुसार राज्यात केवळ 60.5 % इतकेच मतदान नोंदवण्यात आले आहे. तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी (Satara By-Poll Elections)  सुद्धा 60.25 % मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई मध्ये केवळ 44 % तर कोल्हापुरात पाच वाजेपर्यंत सर्वाधिक असे 79 % मतदान नोंदवण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात 80 %, शाहूवाडी मध्ये 75 % टक्के तर कागल मध्ये 74.75 %, भोकर व नेवासा येथे 78% आणि इंदापूर येथे 74 % मतदान रेकॉर्ड झाले आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्र ट्विट

राज्यात आज राजकीय व सेलिब्रिटी मंडळींसह अनेकांनी मतदान केंद्रावर उपस्थिती लावली होती. मात्र यामध्ये भुजबळ कुटुंबीय कुठेही दिसून न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमिताभ बच्चन यांनी सुद्धा मतदान केले नाही.

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसला नाही. राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने त्याचाही मतदानावर परिणाम झाला. आजचा दिवस हा मतदानासाठी खास सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला होता, मात्र याआधीच शनिवार, रविवार आणि जोडून आलेली ही सोमवारीची सुट्टी पाहता नागरिकांनी मतदान करणे टाळले असण्याचा अंदाज आहे. परिणामी या सगळ्या मुळे यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येत आहे.