Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा संयुक्त पत्रक काढून केली. ही घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना (Shiv Sena) नेतृत्वाने संभाव्य उमेदवारांना अधिकारपत्र (एबी फॉर्म) देण्यास सुरुवात केल्यामुळे पक्षातील अनेक इच्छुकांचे धाबे दणानले आहेत. त्यामुळे या इच्छुकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान 'मातोश्री' (Matoshree) येथे गर्दी केली असून, 'आम्हाला वाचवा' अशी साद घातली आहे. या इच्छुकांनी आपणासच निवडणूक उमेदवारी मिळावी यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, ही भेट होऊ शकली नसल्याचे समजते. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मंडळींना कसे सावरावे हा प्रश्न शिवसेनेसहीत भाजप (BJP) समोरही आहे. या इच्छुकांची समजूत वेळीच काढली नाही तर, प्रत्यक्ष निवडणुकीत अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांचे नेते युती होणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत होते. तरीही दोन्ही पक्षातील एका गटाला युती होणार नाही. 2014 प्रमाणे याहीवेळी दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील असे वाटत होते. असे घडल्यास आपणास उमेदवारीची संधी मिळेल अशी आशा हे इच्छुक बाळगून होते. मात्र, युतीची घोषणा झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील अनेक इच्छुकांच्या आकांक्षावर पाणी फिरले आहे. त्यातच ज्या जागा पक्षाच्या वाट्याला आल्या त्याही ठिकाणी अनेक मंडळी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी 'अनेकांमधून एक' कसा निवडायचा हा प्रश्न नोतृत्वासमोर आहे. असे असतानाच शिवसेना नेतृत्वाने 'एबी फॉर्म' थेट आपापल्या जिल्हा प्रमुखांकडे सोपवले आहेत. त्यामुळे हे एबी फॉर्म नेमके कोणाच्या नावाचे हेही समजू शकले नाही. त्यामुळे आपणस संधी मिळेल की नाही या विचाराने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे.
बंडाळी होण्याचा धोका
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी युती केली. दोन पक्षांनी काही जागांची आदलाबदल केली आहे. त्यामुळे अनेकांच्या उमेदवारीवर संक्रांत आली आहे. प्राप्त माहितीनुसार वडाळा हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपला सुटल्याचे समजते. त्यामुळे नाराज झालेल्या मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, शिवसेना पक्षात बंडाळी की नाराजी? ऐरोली, बेलापूर मतदारसंघातून 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 'मातोश्री'वर दाखल)
नाराजांना सावरणार ज्येष्ठ
दरम्यान, शिवसेनेतील काही मंडळी नाराज असलेल्याची कल्पना शिर्ष नेतृत्वाला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी सेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर सोपवल्याचे समजते. त्यासाठी या नेत्यांना विभागवार जबाबदारी देण्यात आली असल्याचे वृत्त आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यास शिवसेनेचा संभाव्य मार्ग बराच सुखकर असणार आहे. परंतू, असे घडले नाही तर, मात्र बंडाळीची शक्यता नाकारता येत नाही.