Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook, File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी युतीचे जागावाटप (BJP-Shiv Sena Seat Formula) करताना समसमान जागांचा आग्रह धरणारी शिवसेना (Shiv Sena) दुय्यम स्थान स्वीकारत 124 जागांवर कशी राजी झाली, याबाबत राजकीय वर्तुळच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रतील शिवसैनिकालाही आश्चर्य वाटले. विधानसभा निवडणुकीत भाजपा (BJP) 164 तर शिवसेना 124 जागा लढवत आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावर शिवसेना नेतृत्व इतके बॅकफुटला का गेले असावे याबाबत दोन्ही पक्षांच्या जागांची सख्या जाहीर झाल्यापासून उत्सुकता होती. ही उत्सुकता फार न ताणता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) यांनीच स्वत: शिवसेनची भूमिका विस्ताराने सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ''युती म्हटली की, देवाण-घेवाण व्हायचीच. यावेळी शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली हे मान्य करावेच लागेल, पण घेवाणीत जे आले त्यात शंभर टक्के यश मिळवायचेच असा आमचा निर्धार आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षांतले प्रमुख लोक महाराष्ट्रात त्यांच्या ओसरीवर बसले आहेत. त्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर त्यांना मोठा घास लागणार व आम्ही तो मोठ्या मनाने मान्य केला आहे. यास सिंहाचा वाटा म्हणायचे की, आणखी काही हे ज्याचे त्यानेच ठरवायचे, पण भाजपच्या पदरात 'मित्रपक्ष' नामक दत्तक विधानेही जास्त आहे, त्यांनाही वाटा द्यावा लागेल अशी एकंदरीत गोळाबेरीज झाली. व त्यात शिवसेनेने सवाशेच्या आसपास जागा लढविण्याचे ठरवले,'' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे. (हेही वाचा, शिवसेना पक्षाकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, ''युती’त दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे व रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे!'' (हेही वाचा, युतीच्या जागावाटपात शिवसेना पक्षाच्या वाट्याला आलेल्या 124 मतदारसंघांची नावे)

प्रदीर्घ उत्सुकतेनंतर अखेर भाजप-शिवसेना युती झाली. युती होणार हे नक्की होते. खरी उत्सुकता होती दोन्ही पक्ष जागावाटपाचा मुद्दा कसा सोडवतात याबाबत. समसमान जागावाटपाचा मुद्दा शिवसेनेने सुरुवातीपासूनच लाऊन धरला होता. त्यामुळे हे जागावाटप कसे होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर दोन्ही पक्षांनी युतीमध्ये किती जागा लढवायच्या हे जाहीर केले आणि ही उत्सुकता संपली. पण, त्यानंतर शिवसेनेने दुय्यम स्थान घेतल्याची टीका सुरु झाली. या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्र सामनाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.