महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी 'या' तीन उमेदवारांपैकी एकाची लागणार वर्णी
Maharashtra Next CM (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले होते तर आज 24 ऑक्टोबर रोजी या प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला. मतमोजणीनंतर पहिल्याच फेरीपासून महाराष्ट्रातील जनतेचा कौल शिवसेना (Shivsena) - भाजपच्या (BJP)  पक्षाकडे झुकताना दिसून आला होता. सरतेशेवटी महायुतीने 160 जागांवर आपला विजयी पताका रोवला. यानंतर आता सर्वांची लक्ष लागले आहे ते महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण बनणार या प्रश्नाकडे. वास्तविक विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपाने प्रचार करतानाच फडणवीस यांना आपला मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून समोर आणले होते मात्र सद्य स्थितीत या खुर्चीसाठी तीन प्रबळ नवे समोर येत आहेत. यापैकी एक म्हणजे फडणवीस हे तर निश्चितच आहेत, तर यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey)  यांच्या नावांची सुद्धा चर्चा आहे.

विधानसभा निवडणूक सुरुवातीपासूनच भाजपाने यंदा आपण 200 जागांवर निवडून येण्याचा दावा केला होता. मात्र आज मतमोजणीत भाजपाला अवघ्या 104 जागांवरच समाधान मानावे लागलेपरिणामी मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपाच्या खराब प्रदर्शनाने शिवसेना बरीच आक्रमक झालेली दिसून आली. निकालदारण्यन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सत्ता वाटपात 50 -50 या फॉर्म्युल्यावर टिकून राहणार असल्याचा इशारा दिला तर संजय राऊत यांनी सुद्धा सकाळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्ह्णून बघायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आदित्य यांच्या नावाची शक्यता टाळता येत नाही.

दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा कोथरूड येथून दणदणीत विजय मिळवला होता. चंद्रकांत यांची महाराष्ट्रावरील पकड पाहता त्यांचे नाव देखील या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत सातत्याने पुढे येत आहे. तर तिसरे दावेदार म्ह्णून देवेंद्र फडणवीस स्वतः या स्पर्धेत आहेत.

दरम्यान, सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारचा कार्यकाळ 9  नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यात येईल व रीतसर शपथविधी सोहळ्यात त्याची अधिकृत घोषणा देखील होईल. मात्र तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.