Maharashtra Assembly Elections 2019: रिपब्लिकन पक्षाला विधानसभा निवडणूकीसाठी 'या' 6 जागांचे वाटप, रामदास आठवले यांच्याकडून घोषणा
रामदास आठवले (Photo Credits-Facebook)

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. याच पार्श्वभुमीवर आज (2 ऑक्टोंबर) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी त्यांना विधानसभा निवडणूकीसाठी कोणत्या जागा देण्यात आल्या आहेत याबाबत जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामध्ये भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) युतीमधील प्रमुख घटक असलेल्या रिपब्लिकन पक्षाला किती जागा द्याव्यात याबाबत चर्चा सुरु होती. पण आज अधिकृतपणे रामदास आठवले यांनी त्यांना देण्यात आलेल्या 6 जागांवर शिक्कामोर्तब केले आहे.

पक्षाला सोलापूर मधील माळशिरस, विदर्भातील भंडारा, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणीतून पाथरी आणि मुंबई येथून मानखुर्द शिवाजी नगर या सहा ठिकाणी जागा विधानसभेसाठी महायुतीकडून देण्यात आल्या आहेत. रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना देण्यात आलेल्या जागा वाटपांसंबंधित घोषणा केली आहे. परंतु जागा वाटप केलेल्या ठिकाणाहून कोणाला उमेदवारी देण्यात येणार हे सुद्धा सांगितले आहे. तर माळशिरसच मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत विजय सिंह मोहिते पाटील निर्णय घेणार आहेत.(3 ऑक्टोबर रोजी अकोला येथे साजरा होणार 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चा 62 वा वर्धापन दिन; रामदास आठवले यांची माहिती)

रिपाईच्या 4 उमेदवारांची नावे सुद्धा रामदास आठवले यांनी जाहिर केली आहेत. त्यामधील मुंबईतून गौतम सोनावणे, फलटण येथून दिपक निकाळजे, पाथरी मधून मोहन फड आणि नायगाव मधून राजेश पवार यांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु माळशिरस आणि भंडारा या दोन मतदारसंघासाठी लवकरच उमेदवाराचे नाव जाहीर करु असे आठवले यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पण काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाला 10 देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. त्याचसोबत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी 288 जागा असून 240 जागांवर शिवसेना- भाजपा युतीचा विजय होणार असल्याचे भाकीतही रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. तसेच उद्या रिपाई पक्षाचा 62 वर्धापन दिन अकोला येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रामदास आठवले विधानसभा निवडणूकीसाठी वर्धापनाच्या निमित्ताने काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.