महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2019) सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नांची शर्थ लावत प्रचारात सहभागी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काल बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Aashti) मतदारसंघात सभा घेतली, यावेळेस पंकजा या भाजपाचे (BJP) अधिकृत उमेदवार भीमराव धोंडे (Bheemrao Dhonde) यांच्या समर्थनार्थ बोलत होत्या, पण इतक्यावरच न थांबता त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना खडेबोल सुनावत असतानाच पंकजा यांनी जनतेसमोर एक निर्धार करत, "जो पर्यंत माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना गुलाल लागत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही" अशी घोषणा सुद्धा केली.
प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः परळी मतदारसंघात येऊन सभा घेणार असल्याचे समोर येत होते. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते, धनंजय मुंडे यांना वाटते की, त्यांच्या भीतीने परळीत मोदीची सभा घेत आहोत. पण पंकजा मुंडे कोणाला भीत नाही, मोदी लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर शाबासकी देण्यासाठी म्हणून परळीत येत आहेत. पंतप्रधान आले तर बीड जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्तीची घोषणा करू शकतील. भरघोस निधी मिळाला, तर कष्ट संपतील राष्ट्रवादीच्या लोकांना विकासाचे देणे घेणे नाही. ते तर भकास गावचे राजे आहेत,” अशा शब्दात पंकजा यांनी टीका केली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात सुरु असणाऱ्या आयाराम गयाराम सत्रावर सुद्धा यावेळी पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. ज्यांनी राष्ट्रवादीची कास सोडली आहे त्यांना पक्षाचे जहाज बुडणार असल्याची खात्री होती म्हणून हे पाऊल उचलले गेले, या लोकांनी भाजपाच्या मोठ्या जहाजात तरण्यासाठी उड्या मारल्या. अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडे आणि एकत्रितरित्या विरोधी पक्षांना सुनावले आहे.