साकोली विधानसभा मतदारसंघात हाणामारी; नाना पटोले यांचा पुतण्या तर परिणय फुके यांचे बंधू गंभीर जखमी
Sakoli Police Station | (Photo Credit- File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019: शांततामय वातावरणात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुक प्रचारास भंडारा जिल्ह्यात गालबोट लागले. भंडारा जिल्ह्यातील साकोली (Sakoli Vidhan Sabha constituency) विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार परिणय फुके (Parinay Fuke) आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले (Nana Patole) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात परिणय फुके यांचे बंधू नितीन फुके (Nitin Fuke) तर नाना पटोले यांचे पुतणे जितेंद्र पटोले (Jitendra Patole) गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (18 ऑक्टोबर 2019) रात्री उशिरा घडली. या घटनेनंतर दोन्ही गटांचे समर्थक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. रात्री उशीरपर्यंत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती.

ही घटना घडल्यानंतर साकोली परिसर आणि मतदारसंघात तणावपूर्ण शांतता आहे. एबीपी माझा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, परीणय फुके यांचे धाकटे बंधू नितीन फुके हे त्यांच्या राहत्या घरातून निघाले होते. दरम्यान, पटोले यांचा पुतण्या आणि त्यांचे काही समर्थकांनी मिळून नितीन फुके यांना वाहनात कोंबले. पुढे हे सर्वजन फुके यांना पटोले यांच्या कार्यालयात घेऊन गेले. इथे नितीन फुके यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत फुके गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर साकोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, राजकीय वादातून कोल्हापूर जिल्ह्यात हाणामारी; तलवारीच्या वारांत आठ जण जखमी)

दरम्यान, दोन्ही गटांमधील हा वाद पोलिस स्थानकात पोहोचला. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. इथे फुके गटाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र पटोले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जितेंद्र पटोले गंभीर जखमी झाले. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी साकोली पोलीस (Sakoli Police Station) ठाण्यात दाखल केल्या आहेत. परिणय फुके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, नाना पटोले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परिणय फुके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर साकोली विधानसभा मतदारसंघांत तणाव पाहायला मिळत आहे. इथे भाजप उमेदवार परिणय फुके विरुद्ध काँग्रेस उमेदवार नाना पटोले असा सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने काट्याची टक्कर आहे. दोन्ही उमेदवारांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते याबात मोठी उत्सुकता आहे.