प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

राजकारण्यांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर प्रसिध्द आहे, शाहू महाराज, ताराराणीची परंपरा लाभलेल्या या जिल्ह्यातील राजकीय वातावरण नेहमीच तापलेले असते. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीत वादातून फार मोठी मारामारी झाल्याची घटना घडली असून, यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापुर जिल्ह्यात, शाहूवाडी तुलुक्यातील गेळवडे गावात ही घटना घडली आहे. गावातील सीताराम लाड आणि बारकू लाड या दोन गटात ही हाणामारी झाली आहे. या हाणामारीत तलवार आणि कोयत्यांनी एकमेकांवर वार केले गेले आहेत.

गावातील या दोन गटांमध्ये काही किरकोळ वाद चालले होते, आणि बघता बघता या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. परिथिती आटोक्यात आणण्याऐवजी या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांने एकमेकांवर शस्त्रे चालवायला सुरुवात केली. या हाणामारीत तलवारीचा घाव बसल्याने सिताराम लाड यांचा उजवा हात तुटला असून, अनेक कार्यकर्ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. हाणामारीत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, परिस्थितीचे गांभीर्य पाहुन गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

स्थानिक निवडणुकांमुळे या दोन राजकीय गटांत वाद झाल्याची माहिती मिळत आहे. वादात तलवारी-कोयते यांचा वापर केला गेल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेकडोच्या संख्येने पोलीस या गावात दाखल झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर गावात तणावाचे वातावरण पसरले असून, परिस्थिती अजून चिघळू नये, यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत.