भाजपमध्ये बंडखोरी?  यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल म्हणाले, 'पक्षनिष्ठा हा गुन्हा असेन तर, तो मी केला आहे'
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook, File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासह विनोद तावडे (Vinod Tawde) , चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) या भाजपच्या दिग्गज नेते आणि विद्यमान मंत्र्यांना धक्का दिला. भाजपच्या पहिल्या यादीत या तिन्ही नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. हे तिन्ही नेते अत्यंत जेष्ठ आणि गेली अनेक वर्षे पक्षनिष्ठेने काम करत आहे. त्यामुळे या तिघांचे उमेदवार यादीत नाव नसणे हे धक्कादायक मानले जात आहे. असे असताना एकनाथ खडसे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या पुढच्या यादीत आपले नाव येऊ शकेल. मात्र, मुहूर्त असल्याने आपण हा अर्ज दाखल करत आहोत असे सांगतानाच पक्षनिष्ठा हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे हे भाजपचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. गेली सुमारे 40 वर्षे ते भाजपसोबत काम करत आहे. भाजप तळागाळात पोहोचविण्यात एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. त्यांना संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेली अनेक वर्षे ते विधानसभा सदस्य म्हणून निवडणून येत आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच्या युती सरकारमध्ये ते मंत्री होते. पुढे अनेक वर्षे ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली अनेक भाषणे गाजली आहेत. आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी खडसे यांची प्रतिमा आहे.

दरम्याना, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यावर त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पाहिले जात होते. 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. मात्र, मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर खडसे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पाहिले गेले. परंतू, देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले आणि खडसे यांचे नाव मागे पडले. पुढे भाजपचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल, कृषी, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री होते. मात्र, पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळा पुढे आणी खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून एकनाथ खडसे यांचा सत्ता असतानाही वनवास सुरु झाला तो आजतागायत सुरुच आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शिक्कामोर्तब)

विशेष म्हणजे फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. परंतू, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सतत क्लिन चिट दिली. एकनाथ खडसे यांच्या वाट्याला मात्र या क्लिन चिटचे भाग्य आले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात खडसे हे क्रमांक दोनचे नेते म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे खडसे यांचे पहिल्या यादीत नाव नसावे याबाबत खुद्द भाजपच्या एका गोटातून आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.