विधानसभा निवडणूकीसाठी भाजप कडून तिकिट मिळणार नाही, एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण
Eknath Khadse | (Photo courtesy: archived, edited images)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजपकडून (BJP) विधानसभा निवडणूकीसाठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. मात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांचे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे एकनाथ खडसे यांचे समर्थक आक्रमक झाले होते. मात्र खडसे यांनी अखेर पक्षाने तिकिट का नाही दिले यावर स्पष्टीकरण दिले आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी खडसे यांना पक्षाने तिकिट देणार नाही असे सांगितले असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. यावर खडसे यांनी मला काही हरकत नसून मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. तसेच पक्षाने दिलेला निर्णय मला मान्य असल्याचे खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तर एकनाथ खडसे यांना भाजपकडून जरी तिकिट दिले नसले तरीही त्यांनी मुक्ताईनगर येथून विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांच्या जागी त्यांच्या मुलीला भाजपकडून तिकिट देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: भाजप कडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीतून 'या' बड्या नेत्यांना डच्चू, पण का?)

एकनाथ खडसे हे भाजपचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. गेली सुमारे 40 वर्षे ते भाजपसोबत काम करत आहे. भाजप तळागाळात पोहोचविण्यात एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. त्यांना संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेली अनेक वर्षे ते विधानसभा सदस्य म्हणून निवडणून येत आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच्या युती सरकारमध्ये ते मंत्री होते. पुढे अनेक वर्षे ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली अनेक भाषणे गाजली आहेत. आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी खडसे यांची प्रतिमा आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 ऑक्टोंबर ही शेवटची तारीख आहे. आज संध्याकाळ पर्यंत पक्षांकडून उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच कोणत्या बड्या नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली आहे किंवा डच्चू देण्यात आला आहे हे स्पष्ट होणार आहे.