महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आता पर्यंत 124 करोड रुपयांची रोकड आणि 975 अवैध हत्यारे जप्त
Indian Money (File Photo)

महाराष्ट्रात उद्या (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. राज्यात आचारसंहिचा लागू झाल्यापासून ते आतापर्यंत विविध ठिकाणाहून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी दिलीप शेंडे यांनी निवडणूकीदरम्यान 124 करोड रुपयांची रोकड आणि 975 अवैध हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू केली. त्यानंतर ते आतापर्यंत लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर वरळी येथून शनिवारी 4 करोड 30 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, हे पैसे कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय आणि अवैध वाहनांतून नेले जात होते. याबाबत अधिक तपास केला जात आहे. ही घटना घडल्यापूर्वी आयकर विभागाकडून मुंबईतून 29 करोड रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती दिली होती.(माजी एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, कार्यकर्त्यांमध्ये जुंपली)

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीला विधानसभा निवडणूकीसाठी पार पडणाऱ्या मतदाना दरम्यान व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन हॅक करुन मत फिरवली जातील अशी शंका वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे महासचिव शिवाजीराव गर्जे यांनी इंटरनेट बंद ठेवण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. तसेच इतर राज्यांमध्ये निवडणुकी दरम्यान अशा प्रकारे इंटरनेट सेवा खंडित करून खबरदारी घेतली गेल्याचे निरीक्षण आहे असे ही म्हटले आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस पथक सज्ज आहेत. तर महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. राज्यात तीन लाखापेंक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि जवानांना तैनात करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.