भाजपला धक्का: काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो
Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

Maharashtra Assembly Election Results 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 आकडेवारी अनेकांसाठी धक्कादायक आहेत. सध्यास्थितीला विविध मतदारसंघांमध्ये भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांना मिळत असलेली आघाडी पाहता शिवसेना हा पक्ष राज्यात किंगमेकर ठरु शकतो. सद्यास्थितीतील आकडेवारी पाहात भाजप 106, शिवसेना 72, काँग्रेस 37, राष्ट्रवादी 51 वंचित 2 मनसे 1 तर इतर जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीवर नजर टाकता राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रिया पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात सत्तेवर बसू शकतो.

दरम्यान, अद्याप कोणत्याही जागेचा निकाल जाहीर झाला नाही. सर्व ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. परंतू, जवळपास सर्व जागांवरचे प्राथमिक अंदाज हाती येत आहेत. यात अनेकांसाठी हे निकाल अपेक्षीत तर अनेकांसाठी अनपेक्षीत आहेत. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या परळी येथून धनंजय मुंडे आघाडीवर तर, पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतही उदयनराजे भोसले हे पिछाडीवर आहेत. तर, तिथे श्रीनिवास पाटील आघाडीवर आहेत. (हेही वाचा, आदित्य ठाकरे 7 हजार मतांनी आघाडीवर; अभिजित बिचुकले यांना अद्याप भोपळाही फोडता आला नाही)

प्राप्त आकडेवारीनुसार, भाजप क्रमांक एक, शिसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. हे कल निकालात परावर्तीत झाले तर, भाजपेच 220 जागांचे लक्ष्य अपूर्ण राहू शकते. भाजप हा विजयाबाबत नेहमीच विविध दावे करत आला आहे. परंतू, सर्वच वेळी हे दावे प्रत्यक्षात उतरु शकत नाहीत,असेच काहीसे दाखवणारी ही आकडेवारी सध्यातरी दिसत आहे.