Maharashtra Assembly Election 2019; गडचिरोलीमध्ये निवडणुकीचे कर्तव्य बजावताना बापू गावडे या शिक्षकांचा मृत्यू
Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election)  राज्यात 288 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. परंतु, गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) निवडणुकीचे कर्तव्य बजावताना एका शिक्षकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बापू पांडू गावडे, (Bapu Gawade) असे या शिक्षकाचे नाव आहे. गावडे यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. खाली कोसळल्यामुळे गावडे यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु, उपचारानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

गावडे हे गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक होते. विधानसभा निवडणुकीचे कर्तव्य बजावत असताना त्यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. गावडे यांना मिरगीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. गावडे यांची विधानसभा निवडणुकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ड्यूटी लावण्यात आली होती. गावडे यांना मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरुन पुसलगोंदी केंद्राकडे पायी जात असताना भोवळ आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क

राज्यात दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी 31 टक्के मतदान झालं आहे. सकाळपासून राज्यातील अनेक दिग्गजांनी तसेच कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यात मतदान होत आहे. राज्यात 8 कोटी 97 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. तसेच हे मतदान निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात 95,473 मुख्य तर 1188 सहाय्यक अशी एकूण 96 हजार 661 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.