
सत्ता गेल्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईतील अध्यक्ष सचिन अहीर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले येथील आमदार वैभव पिचड (NCP MLA Vaibhav Pichad) हेसुद्धा पक्षांतराच्या मार्गावर आहेत. आमदार पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप ( BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पुढील आठवड्यात म्हणजेच येत्या मंगळवारी (30 जुलै 2019) पारपडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी काल (गुरुवार, 25 जुलै 2019) रोजी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर वैभव पिचड यांच्या संभाव्य भजप प्रवेशाबाबत चर्चेने अधिक वेग घेतला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगरमध्ये पार पडलेल्या या मुलाखतींसाठीही वैभव पिचड उपस्थित राहिले नाहीत. महत्त्वाचे असे की, या मुलाखतींनंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे राजीनामे पाठवून दिले. माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार पिचड जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्ती केली. (हेही वाचा, सचिन अहीर यांचा शिवसेना प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधल शिवबंधन; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का)
दरम्यान, आमदार वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा पंकज लॉन्स येथे उद्या (शनिवार, 26 जुलै 2019) बोलवला आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन पुढील वाटचाल निश्चित केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी म्हटले आहे.