विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात अनेक उलथापालथ सुरु आहे. त्यातच आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) आणखी धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निवडणुकीचा अर्ज मागे घेतला आहे. प्रदीप कंद यांनी शिरूर मतहारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे प्रदीप कंद यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.
प्रदीप कंद (Pradeep Kand) यांनी आपला अर्ज मागे घेऊन भाजपचे उमेदवार बाबुराव पाचार्णे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रदीप कंद हे शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार होते. भारतीय जनता पक्षाला त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
प्रदीप कंद यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रात देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आपण पाठिंबा देत आहोत असे सांगत शिरूरमधून भाजपाचे उमेदवार बाबूराव पाचार्णे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
प्रदीप हे खूपच हुशार आणि धडाडीचे नेते आहेत भाजप त्यांचा योग्य तो सन्मान नक्की करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करून प्रदीप कंद भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असेही सांगण्यात येत आहे.