Nagpur: नागपूर येथील एका अल्पवयीन नातीने स्वतःच्याच आजीचा चिरला गळा, हत्येमागील कारण ऐकून पोलीसही चक्रावले
Representational Image (Photo Credits: Facebook)

नागपूर (Nagpur) येथे गेल्या काही दिवसांपासून हत्येचे (Murder) सत्र सुरूच आहे. यातच नागपूर येथे एका अल्पवयीन नातीने स्वत:च्याच आजीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित मुलीसह तिच्या प्रियकरालाही अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक असता हत्येमागचे धक्कादायक कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. नातीच्या प्रियकराला व्यवसाय चालू करण्यास पैसे लागत होते. आजीकडील पैसे आणि दागिने चोरी करताना आजींना जाग आली. यामुळे आपले बिंग फुटू नये, यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयाबाई पांडूरंग तिवलक असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विजयाबाई यांना एक मुलगा असून तो त्याच्या पत्नीसोबत क्वाटरमध्ये वेगळा राहतो. त्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. यामधील दोन मुलीचे लग्न झाले आहे. परंतु, शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजता विजयाबाई यांची मोलकरीण घरी कामाला आली असता तिने आजींना बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्यानंतर मोलकरीणने याबाबत ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मृत महिलेच्या सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यावेळी या महिलेची एक नात उपस्थित नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी पोलिसांना नातीवर संशय आल्याने त्यांनी अधिक तपास केला. यादरम्यान संबंधित नात हत्येच्या दरम्यान आजीच्या घरी असल्याचे तांत्रिक पुराव्यातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच नातीने हत्येची कबूली दिली आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यातील चाकण परिसरात 3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातीच्या पतीला व्यवसाय चालू करण्यासाठी काही पैशांची गरज होती. यामुळे व्यवसाय सुरु करण्यासाठी नातीने आजीच्या घरातून पैसे आणि दागिने लंपास करण्याचे योजना बनवली. त्यानुसार, शनिवारी नात आणि तिचा पती हे दोघेही चोरीच्या उद्देशाने आजीच्या घरात घुसले. परंतु, चोरी करत असताना आजीला जाग आली. यामुळे आपले बिंग फुटू नये, म्हणून दोघांनी मिळून आजीची हत्या केली आहे. या घटनेनंतर नागपूर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.