Amravati: अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्याने पीडिताची गळफास लावून आत्महत्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या साकीनाका परिसरातील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असताना अमरावती येथून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दर्यापूर (Daryapur) तालुक्यात बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रीनुसार येवदा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पीडित मुलगी येवदा गावातील रहिवासी आहे. याच गावात राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला होता. परंतु, बदनामीच्या भितीने पीडिताने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने सलग आठ महिने पीडितावर बळजबरी केली. त्यानंतर गर्भवती राहिल्याने पीडिताने 29 ऑगस्ट रोजी गळफास लावून आत्महत्या केली आहे. हे देखील वाचा- Sakinaka Rape Case: महिला सुरक्षेबाबत नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले महत्वाचे सल्ले

एएनआयचे ट्वीट-

याप्रकरणी येवदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु, त्यानंतर मृत मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात येवदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करीत त्याच्याविरोधात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणं अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.