महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरिक्षा पास करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, आता इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक वर्षात वर्गोन्नती (9th, 11th Class Students Promoted) देण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी माहिती दिली आहे. तसेच याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी म्हंटले आहे. कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी 3 एप्रिल रोजी बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वर्गोन्नती देण्याची घोषणा केली होती. राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही? याबाबत येत्या एक- दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबईच्या रुग्णालयातील बेड शोधण्यासाठी कुठे करायचा संपर्क? आदित्य ठाकरे यांनी दिली महत्वाची माहिती
महाराष्ट्रात काल (6 मार्च) आज 47 हजार 288 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, नवीन 26 हजार 252 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 25 लाख 49 हजार 75 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 4 लाख 51 हजार 375 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.36% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे.त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.