Coronavirus in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आल्याचं चित्र असताना राज्यात आज (7 जून) पासून अनलॉकला सुरूवात झाली आहे. आजपासून 5 टप्प्यांत अनलॉक होणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता पाहून हा अनलॉक सुरू झाला आहे. दरम्यान यामुळे नागरिकांवरील आणि ट्रेडर्स वरील निर्बंधांना आता शिथिल होण्यास सुरूवात होणार आहे. एक ते पाच टप्प्यात राज्यातील सार्‍या जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे नियम असतील यामध्ये मुंबई, कल्याण डोबिंवली मनपा क्षेत्र लेव्हल 3 मध्ये आहे तर लेव्हल 2 मध्ये ठाणे आणि नवी मुंबई आहे. Mumbai Unlock Update: मुंबईकरांसाठी बस सेवा पुन्हा सुरू तर आजपासून 50% क्षमतेसह रेस्टॉरंट्स पुन्हा उघडण्यासाठी परवानगी, जाणून घ्या नवीन बदल.

सध्या औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ हे जिल्हे लेव्हल 1 मध्ये असल्याने पूर्णपणे अनलॉक असतील.

प्रत्येक लेव्हल नुसार कोणत्या गोष्टींमध्ये सूट मिळेल?

मुंबई लोकल -

अद्याप मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सरकसकट उघडण्यात आलेली नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिलांना मात्र प्रवेश असेल.

दुकानं-

मुंबई मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांसोबत आता अन्य दुकानं देखील उघडण्यास मुभा असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानं लेव्हल 1,2 मध्ये सारी दुकानं नियमित उघडी असतील पण लेव्हल 3,4 मध्ये दुकानांच्या वेळेमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंतची मर्यादा असेल. लेव्हल 5 मध्ये देखील 4 वाजेपर्यंत विकडेज मध्ये दुकानं उघडी राहू शकतात शनिवार, रविवार बंद राहतील.

तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं लेव्हल 1,2 मध्ये उघडी असतील. लेव्हल 3 मध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत उघडी असतील आणि 4,5 मध्ये ती उघडण्यास परवानगी नसेल.

मॉल, मल्टिप्लेक्स, थिएटर्स

लेव्हल 1 मध्ये ती उघडण्यास परवानगी असेल. लेव्हल 2 मध्ये 50% तर 3,4,5 मध्ये पूर्ण बंद असतील.

रेस्टारंट

लेव्हल 1 मध्ये पूर्ण क्षमतेने, लेव्हल 2 मध्ये 50% क्षमतेने, लेव्हल 3 मध्ये 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेने तसेच 4 नंतर आणि विकेंडला केवळ पार्सल सेवा/ टेकअवे. लेव्हल 4 मध्ये डाईन इन बंद असेल तर लेव्हल 5 मध्ये केवळ होम डिलेव्हरी असेल.

लग्नविधी

सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. यामध्ये लेव्हल 1 मध्ये लग्नविधींच्या सोहळ्यात उपस्थितींच्या संख्येवर मर्यादा नाही पण लेव्हल 2 मध्ये हॉलच्या 50% क्षमता आणि कमाल 100 लोकं, तर लेव्हल 3 मध्ये 50 आणि लेव्हल 4 मध्ये 25 जण उपस्थित राहू शकतात. तर लेव्हल 5 मध्ये केवळ कुटुंबिय उपस्थित राहू शकतात.

जिम, सलून

लेव्हल 1 मध्ये यांच्यावरील निर्बंध हटवले आहेत. लेव्हल 2 मध्ये 50% क्षमता असेल तर ग्राहकांना आधी अपॉंटमेंट देऊन सुविधा दिल्या जाऊ शकतात. लेव्हल 3 ,4 मध्ये ही एसी न लावता अपॉंटमेंट बेस वर त्या दिल्या जाऊ शकतात.

दरम्यान राज्यभर आजपासून हा अनलॉक सुरू होत असला तरीही नागरिकांना विनाकरण गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी ठराविक दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध कमी-जास्त करण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर देण्यात आले आहेत.