परिवहन सेवा Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

Mumbai Unlock Update: मुंबईत (Mumbai) आज सोमवार, 7 जूनपासून महाराष्ट्र सरकारच्या अनलॉक नियमांतर्गत (Maharashtra Unlock Guidelines) शंभर टक्के प्रवाशांसह मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू होईल, अशी माहिती बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई आणि ट्रान्सपोर्टने (बेस्ट) रविवारी दिली. राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिलतेसाठी पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. “कोणत्याही बसमधील एकूण सीटपेक्षा प्रवाशांची संख्या जास्त होणार नाही आणि प्रत्येक प्रवाश्याला फेस मास्क घालणे अनिवार्य असेल,” बेस्टने (BEST) सांगितले. दरम्यान रेस्टॉरंट्स, अनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे सोमवारी मुंबईत पुन्हा सुरू होणार आहेत. परंतु मॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स आद्यपही बंदच राहतील. (Maharashtra Unlock: तिसऱ्या लाटेचा धोका कायम; गर्दी टाळा, नियम मोडू नका, शंका असेल तर निर्बंध सुरूच ठेवा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार “शनिवार-रविवार वगळता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमता असलेले रेस्टॉरंट्स सुरु ठेवता येतील.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले की, राज्यभरात महामारीची तीव्रता वेगवेगळी असल्याने स्थानिक प्रशासन त्यांच्या झोनमधील निर्बंध कमी करण्यासाठी किंवा कठोर करण्यासंदर्भात निर्णय घेतील. 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित केला गेलेला आहे. राज्यात कोविड-19 प्रकरणात घट झाली असून 12,557 नवीन संक्रमणांची नोंद झाली आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रविवारी दिली. शिवाय, 14,433 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.05 टक्क्यांवर येऊन पोहचला आहे.

महाराष्ट्रात सध्या 1,85,527 सक्रिय प्रकरणे आहेत तर 55,43,267 कोविड-19 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात रुग्णांचा मृत्युदर 1.72 टक्के इतका आहे.