महाराष्ट्रात आज 2608 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 47 हजारांच्या पार- आरोग्य विभाग
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक आहे. आज महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 2608 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 60 जणांचा बळी गेला असून 821 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच येत्या 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. तर विविध ठिकाणची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे नियम शीथिल करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 47910 वर पोहचला असून त्यापैकी 1577 जणांचा बळी गेला आहे. तसेच 13404 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.(Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील 50% कोरोना रुग्ण हे 40 हुन कमी वयाचे असल्याची ठाकरे सरकारची माहिती, पहा आकडेवारी)

दरम्यान, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राज्यात कोरोनाचा वेग संथ झाला असला तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व स्तरातून आता मदतीचा हात पुढे येत आहे.