महाराष्ट्रातील तरुणांना सरकारी योजना आणि राज्यातील उपलब्ध रोजगाराच्या संधींची माहिती देण्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी एक अॅप लॉन्च केले. मुख्यमंत्र्यांनी विधान भवन समिती सभागृहात 'महा युवा' नावाचे हे अॅप (Maha Yuva App) लाँच केले. यावेळी मंत्री सुभाष देसाई आणि अनिल परब उपस्थित होते. या अॅप मध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती असेल. पदवीधर तरुण अॅपवर त्यांचे प्रोफाइल तयार करून, त्यामध्ये त्यांचे फिल्ड आणि आवडीचे तपशील अपलोड करू शकतात, असे निवेदनात म्हटले आहे.
या तरुणांनी अपलोड केलेल्या माहितीच्या आधारे त्यांना उपलब्ध संधींची माहिती दिली जाईल. पदवीधर नोकरी शोधणाऱ्यांना मदत करण्यासाठी ठाकरे सरकारचे हे एक महत्वाचे व्यासपीठ आहे. अशाप्रकारे हे अॅप महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण व राज्य शासन यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम करेल. रोजगाराच्या पर्यायांसह हे अॅप सरकारच्या योजनांबद्दल देखील माहिती देईल.
दरम्यान, एबीपी माझाच्या वृत्तानुसार, आयकर विभाग (Income Tax), महावितरण (Mahavitaran) आणि रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये (RailTel Corporation) नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महावितरण, पुणे मध्ये अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन) पदासाठी जागा असून, त्यासाठी पात्रता 1 0वी पास, ITI अशी आहे.
आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी नोकऱ्या उपलब्ध असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर व दहावी पास अशी आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस पदासाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता BE/B.Tech. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा अशी आहे.