Covid-19 Vaccine: केंद्र सरकार देऊ किंवा नाही? परंतु महाराष्ट्रातील जनतेला कोरोनावरची लस मोफत मिळणार- नवाब मलिक
Nawab Malik (Photo Credits: Twitter)

बिहारमध्ये (Bihar) सत्ता आल्यास सर्वांना मोफत कोरोना लस (Covid-19 Vaccine) देण्याचे आश्वासन भाजपने (BJP) आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. हे आश्वासन भाजपच्या अंगलट आले आहे. या मुद्द्यावरून देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांक आणि कामगार मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनीदेखील आक्रमक भुमिका घेतली आहे. केंद्रात सत्ता असलेली भाजप बिहामध्ये हरली तरीही देशभरात मोफतच कोरोनाच्या लसीचे वितरण केले जाणार आहे. जर केंद्र सरकारने मोफत लसीकरण केले अथवा केले नाही तरी आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मोफत करोनाची लस देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

बिहारमध्ये भाजपा हरली तरीही देशभरात मोफतच लसीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकार देऊ किंवा नाही? परंतु महाराष्ट्रातील जनतेला कोरोनावरची लस मोफत दिली जाणार आहे. भाजपाने बिहारमध्ये आम्ही जिंकलो तर, कोरोनाची लस मोफत देऊ असे म्हटले आहे. भाजपाची ही भूमिका संपूर्ण देशातील लोकांवर अन्याय करणारी आहे, असे आम्हाला वाटते. देशातील सर्व जनतेला लस देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. तसेच भारतात कोरोनाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, याला केंद्र सरकार जबाबदार आहे. ट्रम्प यांच्या प्रेमाखातर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्या भानगडीमुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला आहे, करोडो लोक बेरोजगार झाले आहेत, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. हे देखील वाचा- Eknath Khadse On Devendta Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच एकनाथ खडसे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

दिल्ली, प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यांत भाजपचे सरकार नाही. यामुळे अशा राज्यातील जनतेला मोफत कोरोनाची लस देण्यात येणार नाही का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. तसेच केंद्र सरकार इतर राज्यातील जनतेवर अन्याय करत आहे, असेही म्हटले जात आहे.