Maharshtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकार अल्पमतात; आम्ही सरकार स्थापनेचा विचार केलेला नाही, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
Ramdas Athawale, Devendra Fadnavis (PC - Twitter)

Maharshtra Political Crisis: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला यापुढे विधिमंडळात बहुमत नाही. कारण, शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिली.

रामदास आठवले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. रामदास आठवले यांनी या पोस्टला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, "भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची आज त्यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांमुळे संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरले; तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड, संजय राऊत म्हणाले, 'आक्रोश थांबवता येणार नाही')

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, “शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एमव्हीए सरकार अल्पमतात आले आहे. या सर्व घटनाक्रमात भाजपची भूमिका नाही, असे फडणवीस यांनी मला सांगितले. भाजपने या बंडाला सुरुवातही केली नाही किंवा पाठिंबाही दिलेला नाही, असेही फडणवीस यांनी मला सांगितले. भाजप वाट बघेल आणि त्यानंतर ठरवेलं.

आम्ही सरकार स्थापन करण्याचा विचार केला नाही - रामदास आठवले

रामदास आठवले म्हणाले की, आम्ही सरकार स्थापनेचा विचार केलेला नाही. येणाऱ्या काळात काय होते ते बघू. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत बहुमत दाखवू असे सांगतात. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांना धमकावू नये. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे.