महाविकासाआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेवर आल्यानंतर अवघ्या वर्ष-दीड वर्षांमध्येच दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. परिणामी महाविकासआघाडी सरकार बॅकफूटवर गेले. शिवसेनेचे ( Shiv Sena) संजय राठोड (Sanjay Rathod) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेत अनिल देशमुख (Anil Deshmukh) अशी या मंत्र्यांची नावे. संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. तर अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे. दोन्ही मंत्र्यांवरील आरोप अद्यापही सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे प्रकरणातील तथ्य अद्यापही बाहेर आले नाही. असे असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. संजय राठोड, अनिल देशमुख यांचे काही दिवसांनी पुन्हा पुनर्वसन होणार की त्यांच्या ऐवजी वेगळ्या नेत्यांना संधी मिळणार?
संजय राठोड यांच्याकडील वनखाते सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ज्या खात्याला मंत्री नाही किंवा कोणत्याही मंत्र्यांकडे नाही अशा खात्याचा कारभार स्वत: मुख्यमंत्र्यांकडे असतो. त्यामुळे सध्या तरी या खात्याचा कारभार मुख्यमंत्री स्वत: पाहात आहेत. गृहमंत्री पदाचे बोलायचे तर हे खाते सध्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेले आहे. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री आहेत. आता वास्तव पाहायचे तर अनिल देशमुख काय किंवा संजय राठोड काय. दोन्ही नेत्यांवरील आरोप जर चौकशीअंती खोटे ठरले तर सहाजिकच त्यांना क्लिन चिट मिळणार आहे. क्लीन चिट मिळाल्यानंतर या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळात प्रवेश मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Parambir Singh Case: परमबीर सिंह प्रकरणात अनिल देशमुख, महाविकासआघाडी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका)
अनिल देशमुख यांच्याबाबत बोलायचे तर त्यांच्यावर खरोखरच एक मोठी जबाबदारी पक्षनेतृत्वाने सोपवली होती. गृहमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच या पदासाठी अनेक सक्षम नेते इच्छुक होते. असे असतानाही शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्या गळ्यात गृहमंत्रीपदाची माळ घातली. दुसऱ्या बाजूला संजय राठोड हे शिवसेनेचे एक तरुण मंत्री. परंतू, त्यांना राजीनामा द्यावा लागलेले प्रकरण नाजूक आहे. यात एका तरुणीचा कथीत मृत्यू झाला आहे. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अद्यापत तरी हे मंत्रालय कोणाकडे देण्यात आले नाही.
दरम्यान, जर संजय राठोड आणि अनिल देशमुख यांचे पुनर्वसन झाले नाही तर इतर काही नेत्यांना रिक्त झालेल्या पदांवर संधी मिळू शकते का याबाबत उत्सुकता आहे. वनमंत्री पदासाठी शिवसेनेतून रविंद्र वायकर, नीलम गोऱ्हे, गोपीकिशन बजोरिया आणि आशिष जैस्वाल, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील आमदार अनिल बाबर अशा काही मंडळींची नावे इच्छुकांच्या यादीत चर्चेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जर ठरवले तर यापैकीच एखाद्या नावावर किंवा एखाद्या नव्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
अनिल देशमुख यांच्याबाबततीत बोलायचे तर गृहमंत्री पदावरुन त्यांची विकेट गेलेलीच आहे. त्यामुळे इतक्यात ते पुन्हा त्यांना मिळणे कठीणच आहे. कारण दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून काढून पुन्हा गृहमंत्रीपद देशमुख यांना दिले जाण्याची शक्यता कमीच आहे. दुसऱ्या बाजूला दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेल्या खात्यावर अनिल देशमुख यांची वर्णी लावली जाऊ शकते. परंतू, तेही सर्वस्वी शरद पवार यांच्याच निर्णयावर अवलंबून असणार आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांना काही काळ मंत्री पदापासून बाजूला ठेवले तर विदर्भातील आणखी एखाद्या मंत्र्याला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बाहेरुन आलेल्या एखाद्या नेत्याला ही संधी मिळू शकते.